समस्तीपूर : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील वीरनामा गावात एक अजब घटना घडली आहे. येथे एका महिलेने भर पंचायतीत तिला पतीसोबत नव्हे तर प्रियकरासोबत राहायचं असल्याचा हट्ट धरत पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अखेरीच पत्नीच्या हट्टापुढे हरलेल्या पतीने भर पंचायतीत तिचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. आता या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार समस्तीपूर जिल्ह्यातील देसुआ गावातील रहिवासी असलेल्या महिलेचं सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील एका तरुणसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांनाही दोन मुलगेही झाले. मात्र आजारपणामुळे त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे पती पत्नी एका मुलासह सामान्य जीवन जगत होते.
याचदरम्यान, या महिलेची समस्तीपूर जिल्ह्याकील वीरनामा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सुपौल गावातील एका तरुणासोबत सोशल मीडियावरून ओळख झाली. तसेच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या नात्याची माहिती पतीला समजल्यावर घरात वाद होऊ लागले. नातेवाईक आणि ग्रामस्थांनीही या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
अखेरीस या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रियकराच्या गावातील पंचायतीत पंचायत बोलावण्यात आली. त्यात या महिलेने सर्वांसमोर आपल्याला प्रियकरासोबत राहायचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर तिने तिच्या मुलाला पतीच्या ताब्यात दिले. तर पतीने तिचा हात पकडून तो तिच्या प्रियकराच्या हातात दिला. त्यानंतर पंचायतीमध्येच त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.